न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएमएच) शवविच्छेदन विभागातील कथित गैरप्रकारांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
शवविच्छेदन प्रक्रियेसाठी मृतांच्या नातेवाईकांकडे बेकायदेशीर आर्थिक मागणी केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, अलीकडील एका घटनेत नातेवाईकांना शवविच्छेदनासाठी सुमारे दोन तास प्रतीक्षा करावी लागली. यावेळी संबंधित कर्मचारी मद्यपान करून कार्यालयात झोपलेल्या अवस्थेत आढळल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकारांमुळे रुग्णालयातील कार्यपद्धती आणि प्रशासकीय शिस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याचे तरस यांनी नमूद केले.
प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करावे, दोषींवर शिस्तभंगाची आणि आवश्यकतेनुसार फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच, शवविच्छेदन विभागात सीसीटीव्ही देखरेख, उपस्थिती नियंत्रण आणि उत्तरदायित्वाची प्रभावी यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या आरोपांबाबत महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.


















