- सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २१ ऑक्टोबर २०२६) :- रुग्णांना औषधांच्या चिठ्ठ्या अन्य मेडिकलमध्ये दिल्या जात असल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. रहाटणीतील श्री महावीर क्लिनिकमध्ये घुसून डॉक्टर, त्यांच्या मुलीसह महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. यावेळी डॉक्टरांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी सहा जणांसह दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी दुपारी एकच्या सुमारास लक्ष्मीभक्ती हाउसिंग सोसायटीसमोर, शिवाजी पुतळ्याजवळील श्री महावीर क्लिनिकमध्ये हा प्रकार घडला. डॉ. संदीप वसंतलाल लुनावत (वय ५८) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे.
क्लिनिकशेजारील गुरुकृपा मेडिकलचे चालक ओंकार सुनील पाटील यांनी रुग्णांच्या औषधांच्या चिठ्ठ्या आपल्या मेडिकलमध्ये न देता अन्य मेडिकलमध्ये का दिल्या जातात, असा जाब विचारत क्लिनिकमध्ये गोंधळ घातल्याचा आरोप आहे. त्यानंतर ओंकार यांच्या आई संगीता पाटील यांनी महिला कर्मचारी लता कोलते यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
हा वाद सुरू असताना डॉक्टरांची मुलगी श्वेता हिने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिलाही शिवीगाळ करून ढकलण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर आरोपीची बहीण, तिचा पती आणि अन्य दोन अनोळखी व्यक्ती क्लिनिकमध्ये आल्या. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ७०१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र वैद्यकीय सेवा व्यक्ती आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम २०१० च्या कलम ४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक माळेगावे करीत आहेत.


















