न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड महापालिका ५५० कोटींचे कर्ज काढत आहे. कर्ज काढून मोठे प्रकल्प हाती घेतले जात आहेत. तसे असताना महापालिकेच्या ठेवींची नेमकी माहिती महापालिकेकडून जनतेसमोर मांडली जात नाही. माहिती देण्यास टाळाटाळ करत अधिकाऱ्यांकडून लपवाछपवी सुरू आहे. त्यामुळे वित्त व लेखा विभागाच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे.
मागील काही वर्षात सत्ताधारी आणि मोठ्या राजकीय मंडळींच्या दबावाखाली महापालिकेला कारभार सुरू आहे. आताच्या घडीला प्रशासकीय कार्यकाळात तरतुदीपेक्षा मोठी भांडवली कामे काढली जात आहेत. परिणामी, महापालिकेला म्युन्सिपल बॉण्ड आणि कर्ज काढून प्रकल्प राबविण्याची वेळ आली आहे. महापालिकेवर स्थापत्य, स्थापत्य प्रकल्प, बीआरटी, पाणीपुरवठा, विद्युत, पर्यावरण, ड्रेनेज, भांडार, आरोग्य या विभागाच्या कामांमुळे सद्यस्थितीत ४ हजार कोटींपर्यंतचे दायित्व वाढल्याची चर्चा आहे.
दरम्यान, वित्त व लेखा विभागाकडून महापालिकेवरील दायित्व आणि ठेवींबाबत पत्रकारांना माहिती देण्यास सातत्याने टाळाटाळ केली जात आहे. चुकीच्या धोरणांमुळे महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पावरदेखील याचा परिणाम होऊ शकतो. ठेवी मोडण्याशिवाय तसेच, कर्ज काढल्याशिवाय प्रश्चासनाकडे पर्याय उरलेला दिसत नाही. त्यामुळे महापालिकेकडून ठेवींची माहिती दडवली जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.