- तब्बल अकराशे होर्डिंगचालक व मालकांना थकीत शुल्काच्या नोटिसा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अधिकृत होर्डिंग परवाना नूतनीकरणाची कार्यवाही मागील वर्षात किवळे येथील दुर्घटनेनंतर थांबविण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून अखेर नूतनीकरणाची कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार, १ हजार १०० होर्डिंगचालक व मालकांना थकीत शुल्काच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. ती रक्कम जमा करण्यासाठी २९ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. शुल्क न भरल्यास अनधिकृत होर्डिंग म्हणून कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात महापालिकेच्या जागेत जाहिरात होर्डिंग उभारले जातात. तसेच, खासगी जागामालकांना होर्डिंग उभारण्यास परवानगी दिली जाते. होर्डिग परवानगी व दरवर्षी नूतनीकरण शुल्क हे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उत्पन्न आहे. अनधिकृतपणे होर्डिंग उभारून जाहिरातदार व एजन्सीचालक महापालिकेचे उत्पन्न बुडवतात. तसेच, परवाना घेतल्यानंरही शुल्क भरले जात नाही.
दरम्यान, मागील वर्षात झालेल्या किवळे येथे होर्डिंग कोसळून ५ जणांचा मृत्यू होऊन ३ जण जखमी झाले. ही दुर्घटना १७ एप्रिल २०२३ ला घडली. त्या घटनेवरून विधिमंडळ अधिवेशनात जोरदार चर्चा होऊन महापालिका आयुक्तांना अनेक सूचना करण्यात आल्या. त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शहरातील सर्वच जाहिरात होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला, मात्र, होर्डिंग परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया थांबविण्यात आली होती. ती कार्यवाही आकाशचिन्ह व परवाना विभागाने सुरू केली आहे. हे नूतनीकरण १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी होणार आहे. त्याप्रमाणे संबंधित होर्डिंगधारकांना मागणी नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांना शुल्काची रकम जमा करण्यासाठी २९ फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. शुल्क जमा केल्यानंतर परवान्याचे नूतनीकरण होणार आहे, ज्या होर्डिंगचा परवाना नूतनीकरण होणार नाही, तो अनधिकृत म्हणून काढून टाकण्याची कारवाई महापालिका करणार आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागामागील सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात एकूण १७ कोटी २४ लाख ४४ हजार ६३१ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या पूर्वीच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत पाच कोटींची वाढ विभागाच्या उत्पन्नात झाली होती. मात्र, यावर्षी विभागाला जाहिरात होर्डिंग, उद्योग परवाने आणि नूतनीकरणातून सुमारे १९ कोटींचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे. विभागाने सक्तीने वसुली केल्यास उत्पन्नात आणखी भर पडणार आहे.
शहरातील जाहिरात फलकाच्या परवान्यांचे नूतनीकरण झालेले नाही. ते करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागणी नोटिसा दिल्या आहेत. त्याप्रमाणे शुल्क भरून जाहिरात होर्डिंगमालकांनी नूतनीकरण करून घेणे आवश्यक आहे, असे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी सांगितले.











