- पोलीस आयुक्तांनी मतदान केंद्राच्या इमारतींना भेटी देत घेतला आढावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पुणे, मावळ, बारामती, शिरुर या ०४ लोकसभा मतदार संघाच्या भागाचा समावेश आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीसांकडुन पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावर लावण्यात येणारा बंदोबस्त, बाहेरुन मागविण्यात येणारा बंदोबस्त, मतदान केंद्र निहाय लावण्यात येणारा बंदोबस्त याचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
तसेच गुन्हेगारी टोळया व अभिलेखावरील गुन्हेगारांविरुध्द व्यापक प्रतिबंधक कारवाईचे पिंपरी चिंचवड पोलीसांनी नियोजन केले असुन मोका, एमपीडीए, फौजदारी प्रक्रिया संहिता, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, महाराष्ट्र दारुबंदी अॅक्ट या अधिनियमाअंतर्गत मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाया करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर पोलीस आयुक्त, विनय कुमार चौबे यांनी लोकसभेच्या निवडणुक बंदोबस्त पुर्वतयारीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विविध मतदान केंद्राच्या इमारतींना भेटी देवून एकुण सर्व सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला व त्या सबंधाने सबंधीत पोलीस उपायुक्तांना आवश्यक त्या सुचना दिल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुक ही निर्भयपणे, निःपक्षपातीपणे व पारदर्शकरित्या पार पाडण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज आहेत, असे ते म्हणाले.











