न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- वाकडच्या काळाखडक परिसरातील झोपडपट्टी धारकांना हक्काची घर मिळवून देणारा SRA चा सर्व्हे रद्द करावा, अशी मागणी काळाखडक येथील रहिवाश्यांनी केली आहे. सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात शासनाचे कर्मचारी आले होते. त्यांना देखील येथील नागरिकांनी विरोध केला आहे. यावेळी स्थानिक नेते मंडळीसह येथील नागरिक उपस्थित होते; पण लोकांच्या बाजूने निषेध व्यक्त करण्यात सर्व स्थानिक नेते अपयशी ठरल्याची कुजबुज सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार काळाखडक येथील जागा बिल्डरच्या मालकीची आहे. येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प व्हावा, यासाठी 2012 मध्ये पालिकेकडे प्रस्ताव दिला होता. त्याला शासनाने मान्यता (मास्टर क्र.१५०) देखील दिली. मात्र, मागील १३ वर्षात येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यात आला नाही. इतकेच नव्हे तर त्या दरम्यान, संबंधीत जागा मालक बिल्डरने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवण्यासाठी हलचाली सुरू केल्या. अन् आज पोलिस बंदोबस्तात पुनर्वसन प्रस्तावानुसार फक्त ६०० घरांच्या लाभार्थीचां सर्वे करण्यात आला.
काळाखडक येथील झोपडपट्टीमध्ये सुमारे १४०० घरांचे वास्तव्य आहे; पण पुनर्वसन प्रकल्पात ६०० घरे मिळणार, अशी माहिती समोर येत आहे. मग इतर ८०० घरांचे पुनर्वसन कसे करणार? असा प्रश्न येथील झोपडपट्टी धारकांमध्ये निर्माण झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणकडून दुर्लक्ष होत आहे, असा झोपडपट्टीतील लोकांचा आरोप आहे. त्यामुळे या सर्व्हेला स्थानिक नागरिकांचा विरोध असून येथील रहिवाशांना घरं भेटणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह आहे.