न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्या पाठीशी राहणारा खंबीर पाठीराखा नव्हता. मात्र, आता माजी आमदार विलास लांडे यांच्या रूपाने तो मिळाल्याने आपण निश्चिंत झाल्याची गुगली ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी टाकली. त्यामुळे शहरातील अजित पवार गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे.
पवार साहेबांच्या गळाला कोण-कोण अडकले आहे, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. अजित पवारांचा गट भाजपसोबत गेल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली. “साहेब की दादा, कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली होती. काही इकडे, तर काही तिकडे गेले. चिंचवडमध्ये सोमवारी माजी खासदार गजानन बाबर यांच्यावरील संघर्षयात्री पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याआधी अजित पवार यांनी डावललेल्या, त्यांच्याकडून दुखावलेल्या नेत्यांची मोट बांधण्यासाठी शरद पवारांनी चाचपणी केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेत २०१७ पर्यंत अजित पवार यांचे वर्चस्व आणि दबदबा होता. त्यांचा एकहाती अमल होता, तो नंतर भाजपने कमी केला. आता शरद पवार गटानेही तोच कित्ता गिरवला आहे.
पिपरी-चिंचवड दौ-यामध्ये शरद पवार यांनी भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजितदादांनी दुखावलेल्या नेत्यांशी संवाद साधला. त्यात भोसरीतील माजी आमदार, माजी महापौर, माजी उपमहापौर, पिंपरीतील माजी महापौर, ज्येष्ठ नेते, चिंचवडमधील माजी विरोधी पक्षनेते, माजी महापौरांचा समावेश होता. त्यांना पुन्हा सक्रिय होण्याचा मंत्र पवारांनी दिला असल्याचे बोलले जात आहे.
शरद पवार यांची खास भाषाशैली आहे. ते एखाद्याविषयी मोजक्या शब्दांत सूचक विधान करतात, तर कधी-कधी अनुल्लेखाने मारतात. माजी आमदार विलास लांडे यांच्या देव्हाऱ्यामध्ये पवारांचा फोटो आहे. त्यांना ते देव मानतात. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी ठोस भूमिका घेतली नाही. लांडे यांच्याविषयी पवार नाराज असल्याचे बोलले जाते. वारकरी संमेलनाच्या व्यासपीठावर पवार व लांडे एकत्र होते. ‘साहेबांनी, पिंपरी- चिंचवड शहराचा विकास केला, अशी स्तुतिसुमने लांडे यांनी उधळली. मात्र व्यासपीठावर असूनही पवारांनी लांडे यांच्याकडे पाहिलेही नव्हते. भाषणातही त्यांचा उल्लेख केला नव्हता. मात्र, सोमवारच्या कार्यक्रमात थेट लांडे यांच्यावर शिरुरची जबाबदारीच दिली.











