- वाकडमध्ये उभारणार दिमाखदार आयुक्तालयाची इमारत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मार्च २०२४) :- पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी हक्काची जागा मिळाली आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या मालकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील डिस्ट्रीक सेंटरमधील १५ एकर जागा वाणिज्य चालू दरपत्रकानुसार पोलीस आयुक्तालयाला देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या ठिकाणी सुसज्ज कार्यालय उभारण्यात येणार आहे.
सध्याचे पोलीस आयुक्त कार्यालय पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेच्या इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यान्वित झाले आहे. पोलीस आयुक्तालयासाठी ही जागा अपुरी पडत आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस आयुक्तालयासाठी जागा मिळण्याबाबत शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील लोकप्रतिनिधींनी देखील यासाठी सहकार्य केले.
या पाठपुराव्याला यश आले असून पुणे महानगर विकास प्राधिकरण यांच्या मालिकीची वाकड पेठ क्रमांक ३९ येथील १५ एकर जागा वाणिज्य चालू दर पत्रकानुसार पोलीस आयुक्तालय पिंपरी चिंचवड यांना प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ही जागा काळेवाडी फाटा येथे असून हे ठिकाण मध्यवर्ती, प्रशासकीय व नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. या ठिकाणी लवकरच सुसज्ज पोलीस आयुक्त कार्यालय तसेच इतर कार्यालय उभारण्यात येणार आहेत.













