- कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवत दिली सक्त ताकीद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम कार्यवाहीबाबत संशायास्पद कामकाज करून कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ‘क’ क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे यांना प्रशासन विभागाचे अतिरीक्त आयुक्त (२) यांनी नुकतीच सक्त ताकीद दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे.
प्रशासकीय राजवटीत सर्वच क्षेत्रिय कार्यालयांमध्ये कामकाजाच्या बाबतीत अंधादुंधी पसरली आहे. गैरप्रकारांना चालना दिली जात आहे. यात अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या पदाचा धाक दाखवून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना चुकीची कामे करुन घेण्यास प्रवृत्त करत आहेत. काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये चुकीच्या पध्दतीने हस्तक्षेप करुन स्वहित जपण्यात धन्यता मानत आहेत.
दरम्यान ‘क’ क्षेत्रिय अधिकारी यांनी अतिक्रमण बीट निरीक्षकामार्फत रस्त्यावरच अतिक्रमण करुन बंद अवस्थेत ठेवलेल्या फोर्क लिफ्ट मशीन (दि. २५ मार्च २०२३) रोजी हस्तगत केल्या होत्या. या हस्तगत केलेल्या मशीन मोशी येथील वाहनतळाच्या ठिकाणी जमा करणे आवश्यक व अभिप्रेत होते. मात्र, जवळपास पाच महिने विलंबाने म्हणजे (दि. २७ ऑगस्ट २०२३) रोजी त्या जमा केल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. या कामकाजावर नियंत्रित अधिकारी म्हणून क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांची जबाबदारी होती. त्या कारणास्तव पर्यवेक्षकीय कामकाजात कसुर केल्याने सामान्य प्रशासन विभागाने १७ नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
यावर त्यांनी खुलासा केला होता. खुलाशात तत्कालीन बिट निरीक्षक संतोष शिरसाठ, कनिष्ठ अभियंता यांनी अतिक्रमण विभागात कार्यरत असताना तक्रारदाराच्या फोर्क लिफ्ट मशीनवर नोटीस डकवून अतिक्रमण कारवाई करुन अतिक्रमणातील जप्त साहित्य प्रभागात जमा केले होते. परंतु, नंतर शिरसाठ यांची बदली झाल्यामुळे याकडे कोणीही लक्ष दिले नाही. सदर प्रकार निदर्शनास येताच सदर साहित्य अण्णासाहेब मगर स्टेडीयम येथे रितसर जमा केले. सोपवलेले कामकाज अत्यंत सचोटीने व प्रमाणीकपणे करीत आहे, असे खुलाशात त्यांनी म्हटले.
दरम्यानच्या कालावधीत मशीन मालक यांच्याबरोबर काही आर्थिक तडजोडीचे प्रयत्न झाले असतील? याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्याकडून शंका उपस्थित केली जात होती.
या प्रकारामुळे बोदडे यांचे आपल्या कामकाजावर प्रभावी नियत्रंण नसल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या या गैरवर्तनामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम1979 मधील 3(1)(एक)(दोन)(तीन) चा भंग झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे. यामुळे प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त (२) यांनी अण्णा बोदडे यांच्या प्राप्त खुलाशातील बाबी व शिथील पर्यवेक्षण विचारात घेता, एक वेळ संधी म्हणून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 56(2)(अ) चे अर्थातर्गत तरतूदीनुसार बोदडे यांना यापुढे भविष्यात कार्यालयीन कर्तव्य पार पाडताना पर्यवेक्षकीय कामकाजात अथवा कर्तव्य पालनामध्ये कसुर केल्याचे निर्दशनास आल्यास त्यांच्याविरुध्द कडक शास्तीची कारवाई करण्यात येईल, अशी सक्त त्यांना ताकीद आदेशाद्वारे दिली आहे.











