न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मार्च २०२४) :- निगडी येथे महिला दिनानिमित्त खास महिलांसाठी “जल्लोष तारकांचा “हा कार्यक्रम सादर झाला. यामध्ये दर्जेदार लावण्या सादर करण्यात आल्या. महिलांना मोकळेपणाने आपल्या लोककलेचा आस्वाद घेता यावा म्हणून शिवसेना महिला शहर प्रमुख सरिता साने यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महिलांनी कार्यक्रमाचा पुरेपूर आस्वाद घेतला.
या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते आपल्याच भागातील काही वेगळे काम करणाऱ्या पाच महिलांचा सत्कार झाला. वयाच्या ७५ व्या वर्षी सुरुवात करून ८० व्या वर्षापर्यंत तब्बल सात वेळा वरिष्ठ गटात मॅरेथॉन जिंकणाऱ्या जयश्री टेमकर, मेस चालवून आपल्या घराचा चरितार्थ चालववणाऱ्या आश्विनी बागुल, तोरणा गड ते भक्ती शक्ती अशी दौड समूहाने करून आम्ही जिजाऊच्या लेकी असे अभिमानाने सांगणाऱ्या माधुरी आव्हाड, आपल्या दोन्ही मुलांना साथीदाराशिवाय समर्थ पणे वाढवण्यासाठी काबाडकष्ट करणारी रुक्मिणी,कोणतेही प्रशिक्षण न घेता केवळ चिकाटी आणि मेहनत याच्या बळावर संगणक शिकल्या आणि वाहन चालवणे सुद्धा आशा रेंगे या सर्व महिलांचा सत्कार बारणे यांच्या हस्ते झाला.
“महिलांनी ठरवले तर त्या कोणतेही आव्हान सहजपणे पार करू शकतात आणि त्यांनी हे अनेकवेळा सिद्ध केले आहे, असे बारणे म्हणाले. सूत्रसंचालन ज्योती कानेटकर यांनी केले.