- भोसरीसह पिंपळे सौदागरच्या शाळांची बाजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे २०२४) :- माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत महापालिका शाळांतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. त्या गुणवंत विद्यार्थ्यांची यादी बुधवारी (दि. २९) जाहीर करण्यात आली आहे.
महापालिका शाळांतील २३ विद्यार्थी लाखाचे मानकरी ठरणार आहेत. त्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या १७ तर, उर्दू माध्यमाच्या ७ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये मुलांना मोफत शिक्षण दिले जाते. त्याशिवाय, दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित देखील केले जाते. ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ हजार, ८५ ते ८९.९९ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ५० हजार तर, ९० ते १०० टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाते.
यंदा एक लाखाचे मानकरी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मराठी माध्यमातील सर्वाधिक ५ विद्यार्थी हे माध्यमिक विद्यालय (भोसरी) आणि माध्यमिक विद्यालय (पिंपळे सौदागर) येथील आहेत. भोसरी माध्यमिक विद्यालयाचे ऐश्वर्या बलदे, कोमल मौर्य, नेहा शिंदे, प्रतीक्षा कांबळे, प्रगती कांबळे, तर पिंपळे सौदागर माध्यमिक विद्यालयाचे ऋतिका पाथरकर, विशाखा मोरे, सम्यक वाघमारे, प्रांजल पारवे, महेश ठोसर यांना प्रत्येकी एक लाखाचे बक्षीस मिळणार आहे.
त्या खालोखाल माध्यमिक विद्यालय (कासारवाडी) आणि माध्यमिक विद्यालय (पिंपळे गुरव) येथील प्रत्येकी ३ विद्यार्थ्यांना एक लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. कासारवाडी माध्यमिक विद्यालयाचे गणेश पांडे, रुपाली अहेरी, मुद्रिका सुतार तर, पिंपळे गुरव माध्यमिक विद्यालयाचे पवित्रा थोरवे, अंकिता गिरी, शिवम सारगे हे विद्यार्थी एक लाखाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.
माध्यमिक विद्यालय (निगडी) येथील रोशन मळेकर, अतुल राठोड यांना एक लाखांचे बक्षीस मिळणार आहे. शाळानिहाय लाखाचे मानकरी पुढील प्रमाणे : माध्यमिक विद्यालय (संत तुकारामनगर) अभिषेक साहू, माध्यमिक विद्यालय (काळभोर नगर) श्रेया पवार, माध्यमिक विद्यालय (ने- हरुनगर) – शाहिस्ता सय्यद, माध्यमिक विद्यालय (फुगेवाडी) – सानिक चौधरी, माध्यमिक विद्यालय (रुपीनगर) – रुपाली शिंगे.
दरम्यान, ५० हजारांचे बक्षीस मराठी माध्यमाच्या ६२ तर, उर्दू माध्यमाच्या ५ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. २५ हजारांच्या बक्षिसाचे मानकरी मराठी माध्यमाच्या शाळेतील १०६ विद्यार्थी तर, उर्दू माध्यमाच्या शाळेतील ६ विद्यार्थी ठरणार आहेत.
महापालिका शाळांतील एक लाख रुपयांचे पारितोषिक मिळविणाऱ्या दहावीतील गुणवंतांची यादी जाहीर केली आहे. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन महिन्यांत कार्यक्रम घेऊन गुणवंतांना बक्षीस वितरित करण्यात येईल. त्याच वेळी ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळविणाऱ्या गुणवंतांनादेखील बक्षिसांचे वितरण केले जाईल. – संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, महापालिका शिक्षण विभाग…