- या दोन नावांची शिफारस पक्ष नेतृत्वाकडे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पिंपरी विधानसभेसाठी देवेंद्र तायडे किंवा मयूर जाधव यांनी उमेदवारी देण्याची मागणी सामाजिक न्याय विभाग प्रदेशाध्यक्ष पंडीतराव कांबळे यांच्याकडे केली आहे. पिंपरीच्या पक्ष कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बांधणी संदर्भात आणि लोकसभा आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी सामाजिक न्याय विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते. शहरात आल्याबरोबर सामाजिक न्याय विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चौक, पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पिंपरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि पक्षामार्फत देवेंद्र तायडे किंवा मयूर जाधव यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी पक्षाचे कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते, सामाजिक न्याय प्रदेश उपाध्यक्ष संजय गायकवाड, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सरचिटणीस के. डी. वाघमारे, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, महिला चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष कविता कोंडे, संघटक विवेक विधाते, संदीप गायकवाड सचिन सकाटे, सूरज देविकिरी, विकास रंधवे, जे आर कुंभारे, राजेंद्र कडू, आकाश शिंदे, राजाभाऊ निमसे, रमेश उपार, पांडुरंग विर, आजिनाथ सकट, सलीम डांगे, सुनील कांबळे, रवी पवार, रोहित जाधव, अविनाश कांबळे आदी उपस्थित होते.
पूर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलेले देवेंद्र तायडे हे सध्या पिंपरी चिंचवड शहरातील पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत. पक्ष फूटीनंतर ते शरद पवार यांच्यासोबतच राहिले. एक सुशिक्षित आणि संयमी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. तसेच पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष मयूर जाधव हे पक्षातील एक तरुण आणि उच्चशिक्षित चेहरा असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून त्यांनी शहरात भरीव कामगिरी केली आहे.
पंडित कांबळे यांनी उपस्थितांची मते जाणून घेतल्यानंतर पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा महविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे कसा राहील याबाबत प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. तसेच देवेंद्र तायडे आणि मयूर जाधव यांच्या नावाची शिफारस पक्ष नेतृत्वाला केली जाईल असे सांगितले.