- चिंचवड विधानसभा मतदारसंघ परीवर्तनाच्या वाटेवर?..
- नखाते मैदानात शड्डू ठोकून..
- विद्यमान आमदार अश्विनीताई जगताप यांची उमेदवारी धोक्यात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२४) :- महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात विधानसभा निवडणुकीवरून रस्सीखेच सुरु असतानाच आता भाजपचा बालेकिल्ला समजला जाणारा चिंचवड विधानसभा मतदारसंघ परीवर्तनाच्या वाटेवर आहे. स्व. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जडणघडणीमुळे आणि विकासाच्या अजेंड्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी केव्हाच सेफ झाला. त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी. श्रीमती. अश्विनी लक्ष्मण जगताप या विनासायास या मतदारसंघाच्या आमदारही झाल्या. त्यामुळे चिंचवड मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार मिळाल्या. परंतु, स्व. आ. लक्ष्मण जगताप यांचा मतदारसंघावर असणारा प्रभाव त्या टिकविण्यात काहीशा मागे पडल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील सैरभैर झाले आहेत. आताही त्या या मतदारसंघातून विधानसभेसाठी पुन्हा इच्छुक असल्याचे समजते.
दरम्यान अशातच ‘स्मार्ट रहाटणी’चे शिल्पकार आणि तीन टर्म नगरसेवकपद भूषविणारे मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते यांनी देखील चिंचवड विधानसभेवर दावा ठोकत घराणेशाहीला विरोध केला आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही, अशी टीकाही चंद्रकांत नखाते यांनी केली आहे.
याबाबत न्यूज पीसीएमसीशी बोलताना मा. नगरसेवक चंद्रकांत नखाते म्हणाले, ” स्व. आ. ‘लक्ष्मणभाऊ’ यांनी अगदी सुरुवातीला गावपातळीवर ते आता पिंपळे गुरवपासून ते रावेत-किवळे या शेवटच्या उपनगरापर्यंत कार्यकर्त्यांची फौज तयार केली. त्यांच्या हाकेला तत्पर साद देणारे असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडवलेत. त्यातील अनेकांनी मोठी पदही भूषविली. काहींना निष्ठा राखूनही पदरी निराशाच आली. अशा कार्यकर्त्यांना लक्ष्मणभाऊंनी अखेरच्या टप्प्यात माझ्यानंतर सत्ता विकेंद्रीकरणात सहभाग घ्या, अशी सूचना केली होती. याचाच अर्थ लक्ष्मणभाऊ घराणेशाहीच्या विरुद्ध होते. दरम्यान त्यांच्या जाण्याने त्यांचा वसा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना जपता आलेला नाही. राजकीय वर्तुळात मोठी पोकळी जाणवत आहे. कार्यकर्त्यांचा दिशादर्शक हरपला आहे, अशी भावना चिंचवड मतदार संघातील कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे त्यांचे विचार जगले पाहिजेत. त्यांच कर्तुत्व अडगळीत ठेवण्यासारख नाही. ते स्वयंप्रकाशित आहे. त्यामुळे त्यांचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला त्यांचा वारसा पुढे चालवायचा आहे, असे नखाते म्हणाले.
”भाजपचे तत्कालीन पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांची मुदत संपल्याने या पदासाठी माझ्यासह अनेक नेते इच्छुक होते. अध्यक्षपदी चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख आणि माजी नगरसेवक शंकर जगताप यांची वर्णी लागताच एक गट नाराज झाला होता. त्यावेळी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे समर्थक यांच्यासह १४ माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन राजकारणातील घराणेशाहीला विरोध केला होता. त्यावेळी मला वरिष्ठ नेत्यांनी आगामी विधानसभेबाबत शब्दही दिला होता. मुळात आधीच विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली होती. आता पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबात भाजप उमेदवारी देणार नाही, कारण भाजपमध्ये घराणेशाहीला झुकते माप दिलं जात नाही. त्यामुळे चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे.” – मा. चंद्रकांत नखाते – मा. नगरसेवक, पिं. चिं. मनपा…
”मी मुंबईत पक्षाच्या एका मिटिंगमध्ये आहे. याबाबत मी तुम्हाला नंतर सविस्तर प्रतिक्रिया देते.” – मा. अश्विनीताई लक्ष्मण जगताप, आमदार चिंचवड विधानसभा…














