- पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांकडून ‘अध्यक्ष हटाव’बाबत ठराव?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०२४) :- लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे शहरातील माजी नगरसेवकांसह अनेक इच्छुकांचा लोंढा पक्षाकडे वाढला आहे. येत्या शनिवारी (दि. २०) रोजी पक्षाचे अध्यक्ष खुद्द शरद पवार शहरात कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी येणार आहेत. मात्र, पक्षात सर्वच आलबेल नसल्याचे दिसत आहे.
नुकतीच एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीमध्ये बहुतांशी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शहराध्यक्षांच्या मनमानी कारभार आणि कार्यपद्धतीवर आक्षेप घेत जाहीर नाराजगी व्यक्त केली. शहराध्यक्ष हे पक्षाचा कारभार प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्यासारखा हाकत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. कोणतेही स्थानिक निर्णय घेताना किंवा पक्षाचा कार्यक्रम राबवताना बहुतांशी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही. त्यांच्या मतांचा विचार केला जात नाही. पक्षातील एका माजी नगरसेविकेच्या विचारानेच शहराध्यक्ष पक्षाचा कारभार हाकत असल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे बहुतांशी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी ‘शहराध्यक्ष हटाव’ असा ठराव संमत केला असल्याची माहिती मिळत आहे. लवकरच पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तो पाठवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान येत्या वीस तारखेला शरद पवारांची सभा होणार आहे. तसेच विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे. असे असताना पक्षातील असंतोष पक्ष हितासाठी अयोग्य आहे. त्यामुळे वरिष्ठ यातून कसा मार्ग काढतात? ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.














