न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे प्रतिनिधी : आज गुरुवार दिनांक २७ रोजी सकाळी पुणे शहराच्या मध्यातून जाणाऱ्या नवीन खडकवासला कालव्याला जनता वसहतीजवळ भगदाड पडले.
त्यामुळे दांडेकर पुलावरून लाखो लिटर पाणी सिंहगड रस्त्यावर आले. पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता कि रस्त्यावरील वाहने या पाण्यात वाहून गेली. त्यामुळे प्रशासनाला हा रस्ता बंद करावा लागला.
रस्त्याशेजारीच असलेल्या सर्व्हे नंबर १३० मधील झोपडपट्टीमध्ये पाणी शिरून झोपडपट्टीतील काही घरे वाहून गेली. पाण्यामुळे येथील नागरिकांचा संसार उघड्यावर पडला असून नागरिकांचा मोठा हाहाकार यावेळी पहावयास मिळाला.
कालव्याच्या पाण्यामुळे शहरातील या परिसराचे अतोनात नुकसान झाले असून जीवितहानी झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच पालिका तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहचले असून कालव्यातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे.