पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी राज्य शासनाने नांदेड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्त केली. अशी माहिती मंत्रालयातील सुत्रांनी दिली आहे.
अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची बदली झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्त पदाचा अतिरिक्त भार सहायक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्याकडे दिला होता. त्यापदावर नियुक्ती होण्यासाठी अष्टीकर यांनीही जोरदार प्रयत्न सुरु ठेवले होते. मात्र, राज्य शासनाने अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
त्यामध्ये नादेडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची नियुक्त पिंपरी-चिंचवडच्या अतिरिक्त आयुक्त पदी करण्यात आली आहे. प्रभारी अतिरिक्त आयुक्त अष्टीकर यांच्याकडे कोणकोणते विभाग राहणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
संतोष पाटील यांची प्रथम विदर्भात यवतमाळ येथे उपजिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर मराठवाड्यात ही त्यांनी विविध पदावर काम केले आहे. ते मुळचे सोलापुर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत.
यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली झाली आहे. परंतु, त्यासंदर्भात आदेश अद्यापही प्राप्त झाले नाहीत.










