- वन विभाग आणि पोलिसांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- चिखली आणि मोशी परिसरात बिबट्या आल्याच्या चर्चा, सोशल मीडियावरील फोटो–व्हिडिओ आणि प्रत्यक्ष दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिखलीच्या सोनवणे वस्ती आणि औद्योगिक वसाहत परिसरात बिबट्या असल्याची चित्रे गेल्या दोन दिवसांत व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र ही सर्व माहिती अफवा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
चिखलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंके यांनी सांगितले की, “बिबट्याबाबतचे व्हिडिओ–फोटो हे अफवा आहेत. नागरिकांनी अशा संदेशांना बळी न पडता, काही प्रत्यक्ष दिसल्यास तात्काळ पोलिस किंवा संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा.” वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बारबोले यांनीही स्पष्ट केले की, “गैरसमज पसरवणाऱ्यांवर वन विभागाकडून गुन्हे दाखल केले जातील.”
दरम्यान, मोशी येथील शिवाजी वाडी परिसरात मात्र मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे नागरिकांनी सांगितले. राधाकृष्ण नगर–शिवाजी वाडी परिसरात बिबट्या फिरताना दिसल्याची माहिती मिळताच वन विभागाची रेस्क्यू टीम तातडीने दाखल झाली. अद्याप बिबट्या सापडलेला नसला, तरी परिसरात भीतीचे वातावरण आहे.
संबंधित सोसायटींना सतर्कतेचे आदेश देण्यात आले असून नागरिकांना रात्री घराबाहेर पडताना काळजी घेणे, पाळीव प्राण्यांना मोकळे न सोडणे आणि कोणतीही अपुष्ट माहिती पुढे न पाठवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.












