- तब्बल १०,२८८ हरकती; २०१७ च्या तुलनेत दहा पट वाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०२५):- पिंपरी-चिंचवड महापालिकेने २० नोव्हेंबरला जाहीर केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चुकीची नावे, प्रभागांमधील बदल, मतदारांची नावे वजा होणे अशा त्रुटींमुळे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होत आहेत. बुधवारी एका दिवसात तब्बल ३,२१६ हरकती नोंदल्या गेल्या, तर आतापर्यंत एकूण १०,२८८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. २०१७ मधील ७७२ आणि २०२२ मधील ८,६२० हरकतींच्या तुलनेत यावर्षीची संख्या विक्रमी आहे.
प्रभागातील अनेक मतदारांची नावे वेगवेगळ्या भागांत स्थलांतरित करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. काही माजी नगरसेवकांची नावेही यादीतून गायब झाल्याचे उघड झाले आहे. मतदार यादीतील त्रुटींमुळे प्रशासनावर रोष व्यक्त होत असून, सर्वच पक्षांनी हरकती नोंदवल्या आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांनुसार हरकती :
ड कार्यालय : ६७१
क कार्यालय : ५८०
ब कार्यालय : ५५३
फ कार्यालय : ५०४
ग कार्यालय : ४०१
तर एकूण जमा झालेल्या १०,२८८ तक्रारींमध्ये सर्वाधिक अ क्षेत्रीय कार्यालयातील प्रभागांबाबत तक्रारी आहेत. त्यानंतर क कार्यालयात २,४६१, फ कार्यालयात १,६६८, ड कार्यालयात १,४८०, ग कार्यालयात १,३४५, ब कार्यालयात १,३०६, अ कार्यालयात ८१८ आणि ह कार्यालयात सर्वात कमी ४३० हरकती प्राप्त झाल्या आहेत. गांधीनगर–पिंपरी येथील मतदार यादी कक्षात १४३ हरकती दाखल झाल्या.
दरम्यान, सर्व हरकतींची सुनावणी १० डिसेंबरपर्यंत पूर्ण करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांतील गोंधळामुळे प्रशासनाची मोठी कसोटी लागणार आहे.












