- मग स्थानिक पातळीवरील पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरे आणि शिंदे एकत्रित येतील?..
- संयुक्त शिवसेना म्हणून महापालिका निवडणुकांना सामोरे जातील?..
अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ डिसेंबर २०२५) :- येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राजकीय समीकरणे दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत आहेत. शहरातील भाजप आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीबाबत सुरू झालेल्या चर्चांना सध्या ब्रेक लागलेला दिसतो. जागा वाटपाच्या प्रश्नावरून दोन्ही पक्षांत तणाव निर्माण झाला असून, युतीची शक्यता धुसर झाली असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
सुरुवातीला शिवसेनेकडून तब्बल 32 जागांची मागणी करण्यात आली होती. नंतर तडजोड म्हणून किमान 25 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र, भाजपकडून पंधरा जागादेखील सोडण्याची तयारी नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांत चर्चा वारंवार सुरू होऊनही अंतिम निष्कर्ष निघू शकलेला नाही.
दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत थोडक्यात पराभूत झालेल्या शिवसेनेच्या काही माजी उमेदवारांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही समजते. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला असून, काही ठिकाणी आतल्या गोटात तीव्र चर्चा रंगताना दिसत आहे.
युतीची समीकरणे जुळत नसल्याने शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)शी संधान साधण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती मिळतेय. शिवसेनेकडून सुमारे 25 जागांची मागणी करण्यात आली असून, त्यावर राष्ट्रवादीकडून अद्याप स्पष्ट आणि सकारात्मक भूमिका घेण्यात आलेली नाही. दोन्ही गटांत प्राथमिक पातळीवर चर्चा सुरू असली, तरी अंतिम निर्णय लांबणीवर गेल्याचे दिसते.
तथापि, शिवसेना–राष्ट्रवादी युती झाली, तरी दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांमध्ये भिन्नता असल्याने युतीचा राजकीय फायदा कितपत मिळेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. मतदार युती स्वीकारतील का, की मतांतरे होतील, याबाबत अनिश्चिततेचे वातावरण आहे.
दरम्यान, स्थानिक पातळीवर शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी मतभेद विसरून पुन्हा “संयुक्त शिवसेना” म्हणून निवडणूक लढवावी, अशी चर्चा गुप्त पातळीवर शिवसैनिकांमध्ये सुरू असल्याचेही समजते. आगामी काही दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता असून, अंतिम क्षणी कोणते नवे समीकरण तयार होते, याकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.












