मा. संतोष जराड :- प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ डिसेंबर २०२५) :- प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विनोद नढे यांनी जोरदार प्रचार मोहीम सुरू केली असून, प्रत्येक कॉलनीपर्यंत पोहोचत मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. प्रचाराला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभागात भाजपची वाढती ताकद स्पष्टपणे जाणवत आहे.
काळेवाडी हा प्रभाग कामगारवर्गाचा म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून येथे येऊन स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मुलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करत नढे यांनी नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर आधारित विकास आराखडा मतदारांसमोर मांडला.
दिवसभर दारोदार भेटीगाठी, कोपरा सभा आणि छोट्या बैठका घेत विरोधकांच्या तुलनेत भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळपर्यंत चाललेल्या प्रचार फेऱ्यांमध्ये कोकणे नगरमधील श्रीकृष्ण कॉलनी क्र. ४, नढे नगर परिसर, ओंकार कॉलनी, महागंगा कॉलनी, कापसे चाळ, श्री राधेकृष्ण कॉलनी आणि जय मल्हार कॉलनी येथे नागरिकांशी संवाद साधण्यात आला.
ओंकार कॉलनीत प्रवेश करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीसह पुष्पवृष्टी करून नढे यांचे स्वागत केले. “प्रभागात अपूर्ण कामे पूर्ण करू, नवीन प्रकल्पांना गती देऊ आणि सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून काम करू,” असे आश्वासन त्यांनी मतदारांपुढे व्यक्त केले.
स्थानिक महिलांनी पाणीपुरवठा आणि रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी मांडल्या; तर तरुणांनी क्रीडांगण आणि रोजगारविषयक उपक्रमांची मागणी केली. या सर्व मागण्यांची नोंद घेऊन लवकरच ठोस योजना जाहीर करू, असे नढे यांनी सांगितले.
भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी झाले होते. आगामी निवडणुकीत प्रभागातून भाजपला भरघोस समर्थन मिळेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.












