- या दोन प्रभागांमध्ये होणार मैत्रीपूर्ण लढत…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सत्ता समीकरणांमध्ये मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. दीर्घ चर्चेनंतर राष्ट्रवादी (शरद पवार) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गटांनी एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरायचा निर्णय स्पष्ट केला असून, सोमवारी प्राथमिक जागावाटपावर शिक्कामोर्तब झाले.
निश्चित फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला १८ जागा, तर उर्वरित ११० जागांवर राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडून उमेदवार उभे राहणार आहेत. स्थानिक पातळीवर यामुळे उत्साहाचे वातावरण असून, “एकत्र लढा आणि सत्ता मिळवा” — हेच उद्दिष्ट असल्याचे दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, प्रभाग क्रमांक ९ व २० मध्ये ‘मैत्रीपूर्ण लढत’ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इच्छुकांची संख्या, स्थानिक समीकरणे आणि संघटनात्मक ताकद पाहून दोन्ही पक्ष स्वतंत्र पॅनेल उभे करणार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रभागांमध्ये निकाल कोणाच्या बाजूने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमेदवार निवड, प्रभागनिहाय रणनीती, तसेच प्रचारयंत्रणेची आखणी वेगाने सुरू असून, संयुक्त बैठका आणि कार्यकर्त्यांना उत्साह देण्यावर दोन्ही गटांनी भर दिला आहे. मंगळवारी (दि. ३०) अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता असून, अर्ज भरल्यानंतर प्रचाराला अधिक वेग येणार आहे. नेत्यांच्या म्हणण्यानुसार, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार यांच्या चर्चेनंतरच अंतिम निर्णय आणि समन्वय ठरविण्यात येणार आहे.












