- महायुतीत गोंधळ कायम; उमेदवारीचा आज शेवटचा दिवस…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० डिसेंबर २०२५) :- महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाही महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना युतीबाबत अंतिम निर्णय अधांतरीच आहे. भाजपकडून ११० जागा, शिंदेसेनेला १३ तर रिपाइंला पाच जागा देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा सूत्रांकडून पुढे येत असली, तरी जागावाटप आणि उमेदवारीवर एकमत न झाल्याने युती प्रत्यक्षात कागदावरच अडकून पडली आहे.
भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार यादी जाहीर न केल्याने पक्षांतर्गत नाराजी वाढल्याचे चित्र आहे. इच्छुकांची मोठी संख्या, संभाव्य बंडखोरी आणि नाराज कार्यकर्त्यांचे व्यवस्थापन या सर्व भीतीमुळे नेतृत्व निर्णय पुढे ढकलत असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. सत्ता हातात असूनही दिशा नाही, अशी परिस्थिती भाजपमध्ये निर्माण झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.
दुसरीकडे, शिंदेसेनेची अवस्था अधिकच कठीण झाली आहे. भाजपवर पूर्ण अवलंबून राहिल्याने सेनेने स्वतंत्र उमेदवारांची तयारीच केली नसल्याची कबुली पदाधिकारी देत आहेत. शेवटच्या क्षणी दिलेले अर्ज बाद होण्याचा धोका टाळण्यासाठी उमेदवार निश्चित करण्यात विलंब होत आहे. खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून युतीसाठी प्रयत्न सुरू असले तरी, युती न झाल्यास प्रचार कसा करायचा, याबाबत कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
दरम्यान, शिंदेसेनेचा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाशीही संपर्क सुरू असल्याची चर्चा आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार” अशी घोषणा करून शिंदेसेनेची आणि महाविकास आघाडीची कोंडी केल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी स्वबळाचा पर्याय कायम ठेवत असल्याने आगामी समीकरणांवर त्याचा परिणाम होणार आहे.
नेत्यांची भूमिका…
“महायुती होणारच आहे. शिंदेसेनेला अपेक्षित जागा देण्यात आल्या आहेत. आज ‘ए’ आणि ‘बी’ फॉर्म दिले जातील.”
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप…“युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. युती नाही झाली, तरी सर्व १२८ प्रभागांत आमचे उमेदवार तयार आहेत.”
राजेश वाबळे, महानगरप्रमुख, शिंदेसेना…












