मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून शहरात मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू आहे. चालू आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता केवळ दोन महिने शिल्लक राहिले आहेत.
ही बाब लक्षात घेऊन नागरिकांना कर भरण्यास अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेचे मुख्य कार्यालय तसेच शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांसाठी कर भरण्यासाठी १८ विभागीय कर संकलन कार्यालये कार्यान्वित असून, या ठिकाणी तसेच ऑनलाईन पद्धतीने कर भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांविरोधात कठोर कारवाई सुरू असून, थकबाकीदारांवर मालमत्तांची जप्ती करणे तसेच नळ कनेक्शन खंडित करण्याच्या कारवाया केल्या जात आहेत. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला थकीत मालमत्ता कर वेळेत भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
- सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तसेच शनिवार आणि रविवार या कालावधीत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत सर्व १८ विभागीय कर संकलन कार्यालयांतील कॅश काऊंटर सुरू असणार आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी कर भरण्याची वेळ वाढविण्यात आली असून, दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असणार आहे. या सुविधेचा नागरिकांनी लाभ घ्यावा.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका…











