- ‘मी इथला भाई आहे’ अशी धमकी देत परिसरात दहशत…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ फेब्रुवारी २०२६) :- रहाटणी फाटा परिसरात चहा पिण्यास गेलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला करून परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण तातेराव पवार (वय १७, शिक्षण, रा. थेरगाव) हा १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता रहाटणी फाटा येथील जायका टी येथे चहा पिण्यासाठी गेला होता. यावेळी आरोपी शुभम चव्हाण (रा. थेरगाव, पुणे) याने फिर्यादीस “तू माझ्याकडे काय बघतोस” असे म्हणत कॉलर पकडून गालावर चापट मारली.
यानंतर आरोपीने कमरेतून कोयता काढून फिर्यादीवर वार केला. या हल्ल्यात फिर्यादीच्या डाव्या हाताच्या पंजाला दुखापत झाली. तसेच आरोपीने हातातील कोयता हवेत उंचावत मोठ्याने ओरडून, “मी इथला भाई आहे, कोण मध्ये येतोय ते मी बघतोच, मध्ये येणाऱ्याचा मुडदाच पाडतो,” अशी धमकी दिली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण हे करीत आहेत.












