- राष्ट्रवादी व भाजपकडून संभाव्य इच्छुकांच्या नावांची चर्चा चांगलीच रंगली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत नगरसदस्यपदासाठी विविध राजकीय पक्षांमध्ये हालचाली सुरू झाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपकडून काही संभाव्य नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षनिष्ठा, संघटनात्मक कामगिरी आणि पक्षासाठी केलेले योगदान याचा विचार करून उमेदवारांची निवड केली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत नगरसदस्यपदासाठी सतीश दरेकर, निहाल पानसरे, मोरेश्वर भोंडवे आणि सीमा सावळे यांची नावे चर्चेत आहेत. पक्ष संघटनेत सक्रिय भूमिका बजावणाऱ्या आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत राष्ट्रवादीत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडूनही स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून विलास मडेगिरी, संतोष लोंढे, अनुराधा गोफणे, सुरेश म्हेत्रे, शांताराम भालेकर, चंद्रकांत नखाते, नामदेव ढाके, मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे आणि सुजाता पालांडे यांची नावे चर्चेत आहेत. पक्ष संघटनेत दीर्घकाळ काम करणाऱ्या तसेच स्थानिक पातळीवर मजबूत संपर्क असलेल्या कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वीकृत नगरसदस्य पदासाठी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेतला जाणार असून पक्षनिष्ठा, सामाजिक कामगिरी आणि स्थानिक जनसंपर्क या निकषांवर उमेदवारांची निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.












