- राष्ट्रवादी काँग्रेसकडून विभागीय आयुक्तांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी जेष्ठ नेते, नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय अधिकृतपणे प्रशासनाला कळविण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष योगेश मंगलसेन बहल यांनी पुणे विभागीय आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले आहे.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदाबाबत निर्णय घेण्यात आल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. संबंधित निर्णयाची नोंद प्रशासनाने घ्यावी, अशी विनंतीही पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पक्ष संघटनेत समन्वय राखण्यासाठी तसेच महापालिकेतील कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नगरसेवक भोईर यांची पक्षाकडून निवड करण्यात आल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. महापालिकेतील विविध विषयांवर पक्षाची भूमिका ठरवणे, सभागृहात समन्वय साधणे आणि नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी गटनेतेपद महत्त्वाचे मानले जाते.
दरम्यान, या निर्णयामुळे महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात पक्षाच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये गटनेत्याची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.












