- प्रशासनाकडून नगरसेवकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी..
- महापौरांसह उपमहापौर होणार विराजमान…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी उद्या शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समितीसह विविध ५ विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून नगरसेवक रवी लांडगे तर, उपमहापौर पदासाठी नगरसेविका शर्मिला बाबर यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. तर, उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून नगरसेविका वैशाली काळभोर यांचा एकमेव अर्ज आला आहे. अद्याप काळभोर यांनी माघार न घेतल्याने उपमहापौर पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीवर १६ सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच विविध ५ विशेष समित्यांवर प्रत्येकी ९ सदस्यांची निवड देखील ६ फेब्रुवारी रोजी आयोजित विशेष सभेत करण्यात येणार आहे. विशेष समितीवर सदस्यांच्या नियुक्ती करताना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पक्षांच्या किंवा गटाच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समितीवर कमीतकमी ७५ टक्के सदस्य महिला सदस्यांमधून नियुक्त केले जाणार आहेत, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी दिली.
याबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून सहकार आयुक्त दिपक तावरे काम पाहणार आहेत.












