सुरज करांडे, क्राईम प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ फेब्रुवारी २०२६) :- टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून महिलेची १८ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पिंपरी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०१७ पासून ते दि. ०४ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पिंपरी येथील शगुन चौक परिसरातील एका दुकानात हा प्रकार घडला. आरोपी जयेश चौधरी (वय ४०, व्यवसाय टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, रा. पिंपरी) याने फिर्यादी महिलेला त्याच्या “वन वर्ल्ड टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स” या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दरमहा ६० ते ७० हजार रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले.
आरोपीने विश्वास संपादन करून फिर्यादीकडून धनादेशाद्वारे २५ लाख रुपये गुंतवणूक स्वरूपात स्वीकारले. त्यानंतर आरोपीने एकूण रकमेपैकी ६ लाख ६२ हजार २४१ रुपये परत केले. मात्र उर्वरित १८ लाख ३५ हजार ७५९ रुपये तसेच ठरलेला परतावा न देता करारनामा न करता फिर्यादीची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दलालवाड करीत आहेत.












