- इमारतीवरून उडी मारून केली आत्महत्या…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) :- भोसरी येथील धावडे वस्तीत एका तरुणाने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि. ५ फेब्रुवारी) घडली. पत्नी बेपत्ता असल्याच्या संशयातून संबंधित तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
केशरी प्रसाद साहू (रा. भोसरी, पुणे; मूळ रा. जबलपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साहू हा धावडे वस्तीत एका इमारतीवर चढला होता. याबाबत माहिती मिळताच पोलिस तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी साहू याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. यावेळी साहू याने त्याच्या पत्नीसोबत बोलण्याची मागणी केली. त्यानुसार त्याचे पत्नीसोबत संभाषण करून देण्यात आले. मात्र त्यानंतर त्याने इमारतीवरून उडी मारली.
घटनेनंतर पोलिसांनी साहू याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
दरम्यान, साहू याने आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर चार पानांची सुसाइड नोट तसेच व्हिडिओ व्हायरल केल्याचे समोर आले आहे. या चिठ्ठीत त्याने पत्नी बेपत्ता असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पत्नीला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा आरोप करत संशयित व्यक्तींची चौकशी करावी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासावे आणि पत्नीचा शोध घ्यावा, अशी मागणी त्याने पोलिसांकडे केली होती. मात्र पोलिसांकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा उल्लेखही त्याने चिठ्ठीत केला आहे.
तसेच पत्नी परत येईल, असा विश्वास व्यक्त करत मुलीसाठी जगण्याची इच्छा असल्याचे त्याने नमूद केले आहे. मृत्यूनंतर दफन करावे, तसेच अग्निसंस्कार केल्यास ते मुलीच्या हस्ते करावेत, अशीही इच्छा त्याने व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे भोसरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत.












