- पिंपरी-चिंचवडमधून आमदार अमित गोरखे यांची निवड..
- दौऱ्याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई प्रतिनिधी (दि. ६ फेब्रुवारी २०२६) :- राज्याच्या विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांचा लंडन अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवडमधून विधानपरिषद आमदार अमित गोरखे यांचीही निवड करण्यात आली आहे. हा दौरा १५ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान पार पडणार आहे. आ. अमित गोरखे यांच्या सहभागामुळे शहराच्या दृष्टीने या दौर्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.
दरम्यान या दौर्यामध्ये राज्यातील एकूण १५ आमदारांचा समावेश असून त्यात भाजपकडून आ. अमित गोरखे यांच्यासह विक्रांत पाटील आणि निरंजन डावखरे, विश्वजित कदम, शिवसेनेकडून मनीषा कायंदे तर उबाठाकडून सरदेसाई यांचा समावेश आहे.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लंडनमध्ये शहरी प्रशासन, पायाभूत सुविधा, नागरिकांना पुरवल्या जाणाऱ्या सार्वजनिक सेवा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजाचा अभ्यास या दौर्यादरम्यान करण्यात येणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकांनंतर सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
या अभ्यास दौर्यामध्ये बाबासाहेब देशमुख, परिणय फुके, विक्रम पाचपुते, नमिता मुंदडा, निरंजन डावखरे, स्नेहा दुबे, विक्रांत पाटील, अमित गोरखे, विक्रम काळे, विश्वजीत कदम, वरुण सरदेसाई, मनिषा कायंदे, सुमित वानखेडे आणि योगेश टिळेकर या आमदारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. इतर काही आमदारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. दरम्यान, या दौर्यामागील नेमके उद्दिष्ट आणि प्रशासकीय अभ्यासाचे स्वरूप याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही. मुख्यमंत्री व विधानसभा सभापती या दौऱ्यात काही दिवस असणार आहेत का? हे बघणे देखील औचित्यचे ठरणार आहे.











