- महापालिकेत खळबळ; महिला अधिकाऱ्याची पोलीस ठाण्यात धाव…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ठेका मंजुरीच्या प्रकरणावरून महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली असून यामुळे महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
महापालिकेत भाजपचे महापौर पदावर विराजमान झाल्यानंतर एका पक्ष पदाधिकाऱ्याने महिला उपआयुक्तांच्या दालनात जाऊन नियम व अटी बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. संबंधित ठेका भाजपचे शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्या संस्थेला मिळावा, यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. महिला अधिकाऱ्यांनी नियमानुसार माहिती देण्याचा प्रयत्न केला असता, “माझ्या सांगण्याप्रमाणे नियम बदला, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे.
यावेळी संबंधित पदाधिकाऱ्याने मोठ्या आवाजात बोलत शिवीगाळ केल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकारामुळे महिला अधिकारी घाबरल्याने त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीत भाजपचे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आले असून पक्षाची सत्ता पुन्हा प्रस्थापित झाली आहे. अशा परिस्थितीत काही पदाधिकाऱ्यांकडून दादागिरी सुरू झाल्याची चर्चा प्रशासनात सुरू आहे.
या प्रकरणाबाबत भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दोन्ही बाजूंची माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. शिस्तप्रिय पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपकडून संबंधित पदाधिकाऱ्यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.












