- ‘पूर्ण वेळ महापौर आणि अर्धवेळ आयुक्त’ हे समीकरण काही जुळणारे नाही..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नव्या महापौरांची निवड झाल्यानंतर शहराला राजकीय नेतृत्व मिळाले असले, तरी प्रशासनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पूर्णवेळ आयुक्तपद अजूनही रिक्त असल्याने अनेक प्रशासकीय निर्णय प्रलंबित राहिल्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी शहरातील विकासकामे तसेच दैनंदिन नागरी सेवांवर त्याचे परिणाम जाणवू लागल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
माजी आयुक्त शेखर सिंह यांची राज्य शासनाने बदली केल्यानंतर त्यांच्या जागी ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडे मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पासोबत महापालिकेची जबाबदारी असल्यामुळे महापालिकेच्या कामकाजावर अपेक्षित गती येत नसल्याची तक्रार होत आहे. आठवड्यात मर्यादित कालावधीत ते पालिकेत उपलब्ध असल्याने नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे समोर येत आहे.
याशिवाय नवीन विकासकामांना मंजुरी देणे, निविदा प्रक्रिया राबविणे आणि आगामी अर्थसंकल्प अंतिम करण्याची प्रक्रिया यामध्येही विलंब होत असल्याचे चित्र आहे. काही कामे मंजुरीअभावी रखडल्याने विकासकामांचा वेग मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, शहरात वाढती अनधिकृत बांधकामे, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील अडचणी तसेच अपूर्ण रस्ते व पूल प्रकल्प यांसारखे अनेक प्रश्न नागरिकांसमोर आहेत. या पार्श्वभूमीवर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, अशी मागणी विविध स्तरांतून जोर धरत आहे. प्रशासनात स्थैर्य आल्यास नागरी सेवांमध्ये सुधारणा होऊन विकासकामांना अपेक्षित वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.












