- दवाखान्याची नविन इमारत उदघाटनाच्या प्रतिक्षेत..
- आवारात दारुड्यांचा अड्डा, कचऱ्याचा खच..
- अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- प्रभाग क्रमांक ११ चिखली स्पाईन रस्त्यावरील शरदनगर, नक्षत्र चौक येथे उभारण्यात आलेला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर दवाखाना सध्या धूळखात पडल्याचे चित्र आहे. नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी उभारलेली नवी कोरी इमारत अद्याप सुरू न झाल्याने परिसरातून नाराजी व्यक्त होत आहे.
चिखलीगावाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत असलेल्या या दवाखान्याचे आवार मोठे असल्याने सध्या तेथे दारुडे आणि गर्दुल्यांची वर्दळ वाढली आहे. संध्याकाळच्या सुमारास येथे बसून दारू पिणे, गोंधळ घालणे असे प्रकार सुरू असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत आहे. परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक कचरा आणि अस्वच्छता पसरलेली दिसून येते.
दवाखान्याचे प्रवेशद्वार बंद असले तरी आवारात अनधिकृत पार्किंगचा अड्डा तयार झाला आहे. काही जणांनी वाहनांची रांग लावल्याने परिसर अधिकच बकाल झाला आहे. अशा स्थितीत येथे अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून उभारलेली इमारत निष्क्रिय अवस्थेत असताना प्रशासन मात्र बघ्याच्या भुमिकेत आहे.
प्रभाग ११ मधील भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, दवाखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
आरोग्यसेवेची अपेक्षा असलेल्या नागरिकांना सध्या दवाखान्याचा बंद दरवाजा आणि अस्वच्छ परिसरच पाहावा लागत असल्याने महापालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत लवकरच संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन दवाखाना नागरिकांसाठी खुला केला जाईल. आवारात स्वच्छता राखली जाईल. – निलेश नेवाळे, नगरसेवक पिंपरी-चिंचवड मनपा…












