न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे महापालिका प्रशासन सतर्क झाले असून संबंधित बीट निरीक्षकांना कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील विविध भागांत विनापरवाना व नियमबाह्य बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी ही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व परवानगी विभागाच्या आढावा बैठकीत शहरातील परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असतानाही अनेक ठिकाणी प्रभावी कारवाई होत नसल्याचे बैठकीत समोर आले. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पिंपळे गुरव, पिंपळे निलख, सांगवी, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, भोसरी, चिंचवड, कासारवाडी, वाल्हेकरवाडी आणि दापोडी या भागांमध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे. तसेच नदीकाठ परिसरात भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकामे उभी राहत असल्याचेही निदर्शनास आले आहे. या प्रकारांमुळे बकालपणा आणि महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बैठकीत बीट निरीक्षकांकडे अनधिकृत बांधकामांची माहिती असतानाही अनेक प्रकरणांमध्ये वेळेवर कारवाई होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास संबंधित बीट निरीक्षकांवरही शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिका प्रशासनाने यापुढे नियमित तपासणी मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला असून नियमबाह्य बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.












