- पूर्णवेळ आयुक्त येताच भरतीप्रकियेला येणार वेग?..
- आकृतीबंधावर मात्र टांगती तलवार…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकामध्ये पुढील तीन ते चार महिन्यांत मोठ्या प्रमाणावर नोकरभरती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध संवर्गातील अंदाजे ४०० पदे भरण्याचा प्रस्ताव प्रशासन स्तरावर चर्चेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
महापालिकेतील अनेक विभागांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासत असून, आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, करसंकलन आदी विभागांतील कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.
सध्या अर्धवेळ कार्यभार सांभाळणारे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या कार्यकाळात या भरतीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे नव्याने बदली होऊन आलेले आयुक्त पदभार स्वीकारताच या भरती प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान दर दोन ते तिन महिन्यांत महापालिकेतील मोठ्या प्रमाणावर अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे आकृतीबंधानुसार (स्टाफ पॅटर्न) होणाऱ्या नोकरभरतीसाठी नुकत्याच सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेऊन रिक्त पदे तात्काळ भरावीत, अशी शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे.
महापालिकेच्या विविध विभागांकडून रिक्त पदांची माहिती संकलित करण्यात येत आहे. अंतिम मंजुरीनंतरच भरती प्रक्रिया राबवली जाऊ शकते. पुढील तीन ते चार महिन्यानंतरच याबाबत स्पष्टता येईल. – मनोज लोणकर, सह आयुक्त, पिंपरी-चिंचवड मनपा…












