- वसुली रखडल्याने विकासकामांसाठी निधी कसा उभारणार?..
- महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर होणार परिणाम…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत मालमत्ता कर वसुलीला अपेक्षित प्रतिसाद मिळत असला तरी अद्याप तब्बल २ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी कराचा भरणा न केल्याने महापालिकेच्या महसुलावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील एकूण ७ लाख ३२ हजार ३०२ मिळकतींपैकी ५ लाख २६ हजार २२६ मालमत्ताधारकांनी कर भरला असला तरी २ लाख ६ हजार ७६ मिळकतींचा कर थकित असल्याची माहिती समोर आली आहे.
महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने कर भरण्यासाठी विविध सवलती तसेच ऑनलाइन, रोख, धनादेश, बीबीपीएस व ई-डीसीएससारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तरीही मोठ्या प्रमाणात मालमत्ताधारकांनी कर भरण्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महापालिकेच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महापालिकेने पहिल्या व दुसऱ्या तिमाहीत विविध सवलती जाहीर करून नागरिकांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र उर्वरित मिळकतींकडून कर वसुली रखडल्याने आगामी विकासकामांसाठी निधी उभारणीसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, ऑनलाइन माध्यमातून ४ लाख ३० हजार २७९ करदात्यांनी कर भरला असून रोख स्वरूपात ५६ हजार ४५०, धनादेशाद्वारे १२ हजार ५११, बीबीपीएस सुविधेद्वारे २६ हजार ८८१ आणि ई-डीसीएस सुविधेद्वारे केवळ १०५ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. यावरून ऑनलाइन पद्धतीला नागरिकांची पसंती मिळत असली तरी उर्वरित मोठा करदाते वर्ग अद्याप कर भरण्यापासून दूर असल्याचे स्पष्ट होत आहे.
थकबाकीदारांकडून कर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. थकीत कर तातडीने न भरल्यास जप्ती, दंडात्मक कारवाई तसेच अन्य कायदेशीर उपाययोजना करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापौर रवि लांडगे यांनीदेखील करदात्यांना आवाहन करताना, नागरिकांच्या सोयीसाठी शहरातील १८ विभागीय कर संकलन कार्यालये शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले.











