- पत्रा शेड व नियमबाह्य वाढीव बांधकाम हटवले...
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- रावेत परिसरात वाढत असलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाने धडक मोहीम राबविली. महापालिकेच्या पथकाने सर्व्हे क्रमांक १४३ येथे उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर पत्रा शेडवर कारवाई करून ते पूर्णपणे हटवले.
ही कारवाई शांततेत पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात आली होती. यावेळी दहा पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १२ जवान बंदोबस्तासाठी उपस्थित होते. अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी जेसीबी यंत्रासह गॅस कटरचा वापर करण्यात आला. नियोजनबद्ध पद्धतीने पथकाने संपूर्ण शेड हटवून जागा मोकळी करण्यात यश मिळवले.
कारवाईदरम्यान बीट निरीक्षक सुहास भगत, साईनाथ देसाई, बळीराम वाघमारे तसेच प्रियांका तोडकरी-चौरंगे यांनी सक्रिय सहभाग घेतला. ‘ब’ क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
याच मोहिमेअंतर्गत रावेत येथील सुवर्णदीप रेसिडेन्सी परिसरातही तपासणी करण्यात आली. संबंधित इमारतीमध्ये परवानगीशिवाय करण्यात आलेल्या वाढीव बांधकामाची पाहणी करून नियमबाह्य भाग हटविण्यात आला. महापालिकेकडून पूर्वी अनेक वेळा सूचना देण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनाने कठोर पावले उचलल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रावेत व आसपासच्या भागात अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करताना महापालिकेची आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.












