- निवडणुकीतील बंडखोर भाजपच्या रडारवर..
- पक्षश्रेष्ठी कडक कारवाई करण्याच्या तयारीत…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १३ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या बंडखोरीमुळे पक्षाला फटका बसल्याचा निष्कर्ष भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत नोंदविण्यात आला. पुण्यातील घडामोडींच्या धर्तीवर शहरातील बंडखोरांवर कठोर कारवाई करण्याबाबत पुढील दोन दिवसांत निर्णय घेण्याची भूमिका बैठकीत मांडण्यात आली.
निवडणुकीनंतर पक्षनेत्यांची निवड करताना कोअर कमिटीला विश्वासात न घेतल्याची नाराजी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानंतर पुण्यात झालेल्या बैठकीत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे दिल्याची चर्चा आहे.
शहरातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या कोअर कमिटी बैठकीत निवडणुकीच्या निकालाचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. शंभरहून अधिक जागा जिंकण्याचा दावा करण्यात आला असतानाही पक्षाला ८४ जागांवर समाधान मानावे लागल्याची नोंद करण्यात आली. अपेक्षेपेक्षा कमी यश मिळण्यामागील कारणांवरही चर्चा झाली.
बैठकीत विविध विषय समित्या, स्थायी समिती तसेच शिक्षण, महिला व बालकल्याण, क्रीडा, विधी, जैवविविधता आणि प्रभाग समित्यांमधील सदस्य व अध्यक्षपद वाटपाबाबत चर्चा झाली. पक्षाशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना स्वीकृत सदस्यपदाच्या माध्यमातून संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांतून होत असल्याची माहिती बैठकीत मांडण्यात आली.
निवडणुकीदरम्यान बंडखोरी झाल्यामुळे काही प्रमुख नेत्यांना पराभवाला सामोरे जावे लागल्याचेही बैठकीत नमूद करण्यात आले. त्यामुळे बंडखोरांविरोधात कारवाई करण्याची मागणी उपस्थित सदस्यांनी केली. या संदर्भात सविस्तर अहवाल तयार करून वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.











