- पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील यांचाही समावेश हवा…
सुरज करांडे प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेत १० स्वीकृत सदस्यांची निवड होणार असून या पदांवर विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ व्यक्तींना संधी द्यावी, अशी मागणी राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
राज्य सरकारच्या निर्देशानुसार स्वीकृत सदस्य निवडीची तरतूद करण्यात आली असून, डॉक्टर, वकील, निवृत्त प्रशासकीय अधिकारी, इंजिनिअर, प्राध्यापक तसेच समाजकार्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींना संधी देता येते. २०२२ च्या सुधारित अध्यादेशानुसार संबंधित व्यक्तींना कोणत्याही राजकीय पक्षाच्या शिफारशीशिवाय अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
मागील प्रशासकीय काळात झालेल्या गैरकारभारावर आवाज उठविणाऱ्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना सभागृहात स्थान मिळाल्यास कामकाजावर अधिक प्रभावी नियंत्रण राहील, असा युक्तिवाद निवेदनात करण्यात आला आहे. वाढीव दरांच्या निविदा किंवा चुकीच्या निर्णयांवर अभ्यासपूर्ण चर्चा होण्यासाठी तज्ज्ञ सदस्यांची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आयुक्तांनी आपल्या अधिकारांचा योग्य वापर करून करदात्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अभ्यासू व्यक्तींना संधी द्यावी तसेच अर्ज सादर करण्याचे आवाहन करावे. स्वीकृत सदस्यपदावर केवळ राजकीय व्यक्तींचा हक्क नसावा, असे कोल्हटकर यांनी निवेदनात म्हटल आहे.












