- आढळला तर जबाबदार कोण?..
- मेटल डिटेक्टर व बॅग-चेकिंग मशीनअभावी सुरक्षेचा धोका वाढला – भाऊसाहेब भोईर…
संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १९ फेब्रुवारी २०२६) :-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्याचा आरोप करत, “येथे बाॅम्ब आढळला तर जबाबदार कोण?” असा सवाल महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी उपस्थित केला आहे. बुधवारी त्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेतील त्रुटींवर बोट ठेवले.
पाहणीदरम्यान रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह भेटीसाठी किंवा इतर कारणाने येणाऱ्या नागरिकांची कोणतीही तपासणी होत नसल्याचे आढळून आले. महापालिकेचे सुरक्षारक्षक येणाऱ्यांची कोणतीही चौकशी किंवा तपासणी न करता थेट आत सोडत असल्याचे भोईर यांच्या निदर्शनास आले. प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर अथवा बॅग-चेकिंग मशीन नसल्याची बाबही त्यांनी उघड केली.
अशा परिस्थितीत घातक शस्त्रे किंवा स्फोटके रुग्णालयात आणली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे भोईर म्हणाले. शहरातील सर्वांत मोठ्या महापालिकेच्या रुग्णालयात दररोज मोठ्या प्रमाणावर नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे सुरक्षेचा धोका संभवत असून रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या जिवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर तातडीने मेटल डिटेक्टर व बॅग-चेकिंग मशीन बसवून सक्षम सुरक्षा व्यवस्था उभारावी, तसेच सुरक्षारक्षकांना आवश्यक सूचना व प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी तात्काळ दूर करून नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.












