- आंतरराष्ट्रीय अभ्यास दौऱ्यातून आ. अमित गोरखे यांचा ‘शाश्वत आणि पारदर्शक’ पिंपरी-चिंचवडचा संकल्प!..
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२४ फेब्रुवारी २०२६):- महाराष्ट्राच्या प्रशासन, कृषी, पर्यावरण व संसदीय कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आमदार अमित गोरखे यांच्यासह महाराष्ट्रातील १५ आमदारांनी १७ ते २१ मार्च या कालावधीत लंडन व वेल्स येथे पाच दिवसीय अधिकृत अभ्यास दौरा यशस्वीपणे पूर्ण केला. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेल्स ट्रिनिटी सेंट डेव्हिड’ यांच्या वतीने आयोजित या अभ्यासक्रमात जागतिक नेतृत्व, पुराव्यावर आधारित धोरणनिर्मिती, शाश्वत कृषी व्यवस्थापन व संसदीय लोकशाही प्रणालीचा सखोल अभ्यास करण्यात आला.
प्रशासकीय पारदर्शकता आणि उत्तरदायित्व…
दौऱ्याबाबत माहिती देताना आमदार अमित गोरखे म्हणाले, शासन व्यवस्थेत केवळ धोरणे जाहीर करणे पुरेसे नाही, तर त्या धोरणांचे प्रत्यक्ष परिणाम नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. इम्पॅक्ट असेसमेंट, डिजिटल मॉनिटरिंग व उत्तरदायित्व हीच आधुनिक प्रशासनाची खरी ओळख आहे. पिंपरी-चिंचवडसारख्या झपाट्याने वाढणाऱ्या औद्योगिक शहरात डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया आणि कार्यक्षम अंमलबजावणी अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक योजनेचा खर्च-लाभ विश्लेषण (कॉस्ट-बेनिफिट अनालिसिस) व परिणाममापन प्रणाली विकसित केल्याशिवाय प्रशासन प्रभावी ठरणार नाही. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये ‘कार्यक्षमता डॅशबोर्ड’, विभागनिहाय मुख्य कार्यक्षमता निर्देशांक (KPIs) आणि नागरिकांना खुली माहिती प्रणाली विकसित करण्याचा माझा प्रयत्न राहील.
वेळेचे नियोजन आणि शिस्त…
वेल्समधील अनुभवाबाबत बोलताना आमदार अमित गोरखे यांनी वेळेच्या नियोजनावर (टाईम मॅनेजमेंट) विशेष भर दिला. त्यांनी म्हटलंय की, वेल्समधील लोकांची वेळेप्रती असलेली शिस्त कडक आहे. ही वक्तशीरपणाची संस्कृती त्यांच्या प्रगतीचा मुख्य आधार असून, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कामकाजातही अशीच शिस्त आणि उत्तरदायित्व आणण्याचा माझा प्रयत्न राहील.
कचरा व पाणी व्यवस्थापनाचे जागतिक मॉडेल…
वेल्स देश कचरा व्यवस्थापनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर भाष्य करताना आमदार गोरखे म्हणाले, तिथली अत्याधुनिक पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) पद्धत आणि कचऱ्याचे संसाधनात रूपांतर करण्याची कला आदर्श आहे. तसेच, पाण्याचा प्रत्येक थेंब जपण्यासाठी तिथे राबवली जाणारी ‘चक्रीय जल अर्थव्यवस्था’ (सर्क्युलर वॉटर इकॉनॉमी) थक्क करणारी आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आपण पिंपरी-चिंचवडमध्ये राबवण्यासाठी धोरणात्मक पावले उचलणार आहोत.
लंडनमध्ये शिवजयंतीचा उत्साह…
दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात आमदार अमित गोरखे उत्साहाने सहभागी झाले. यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘रयतेचे राज्य’ हे सुशासन आणि पारदर्शकतेचे जागतिक स्तरावरील सर्वात आदर्श उदाहरण आहे. तीच शिवकालीन सुशासनाची मूल्ये आधुनिक प्रशासनात आणि लोकशाहीत राबवण्याचा संकल्प या निमित्ताने केला आहे. अतिशय गौरवपूर्ण आणि उत्साही वातावरणात सातासमुद्रापार ही शिवजयंती साजरी करण्यात आली.
ऐतिहासिक संसदीय वारसा आणि युवा नेतृत्व…
लंडनचे पार्लमेंट (पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर) हे इ.स. १७०० च्या सुमारास साकारले गेले असून, याच महान वास्तूची आणि तिथल्या लोकशाही प्रक्रियेची प्रतिकृती आपल्या भारतीय संसदेच्या रचनेत दिसून येते. ऐतिहासिकदृष्ट्या याच काळात ब्रिटनला वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पहिला तरुण पंतप्रधान लाभला होता; हे युवा नेतृत्वाच्या संधींचे उत्तम उदाहरण असल्याचे आमदार गोरखे यांनी नमूद केले. वेल्समध्ये तरुणांना वयाच्या १६ व्या वर्षीच मतदानाचे आणि निवडणूक लढविण्याचे अधिकार आहेत, जे युवा सक्षमीकरणाच्या दृष्टीने क्रांतीकारक आहे.
शाश्वत कृषी आणि पर्यावरणपूरक विकास…
हवामान बदल ही गंभीर समस्या असल्याचे सांगत आमदार अमित गोरखे यांनी ‘क्लायमेट-रेझिलियंट’ पिके आणि अचूक शेती यावर भर दिला. ‘सेंटर फॉर अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी’ येथील भेटीनंतर त्यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये सौरऊर्जा प्रकल्प, ई-वाहन चार्जिंग नेटवर्क आणि शून्य-कार्बन (झिरो-कार्बन) तंत्रज्ञानाचा पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली. पाच दिवसांचा सखोल आंतरराष्ट्रीय अभ्यास दौरा यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, सर्व सहभागी सदस्यांसाठी विशेष प्रमाणपत्र वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘कॉमनवेल्थ पार्लिमेंटरी असोसिएशन’ (CPA) चे उपसचिव जार्विस मतिया यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष प्रा. राम शिंदे व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार अमित गोरखे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ‘कॉमनवेल्थ लीडरशिप इन्स्टिट्यूट’चे अध्यक्ष डॉ. जोनाथन ग्रे, ‘UWTSD’चे इयान बॅसेट आणि डीन प्रो. जेरेमी स्मिथ यांसारख्या आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती होती.
लोकशाही सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय…
दौऱ्याच्या शेवटी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक निवासस्थानास (१० किंग हेन्री रोड) भेट दिल्यानंतर आमदार गोरखे म्हणाले, सामाजिक न्याय, समता आणि बंधुता हीच आमच्या राज्यकारभाराची दिशा आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये वंचित घटकांसाठी कौशल्य विकास आणि संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी अधिक बळकट करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुशासन तत्त्वांचा आदर्श आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानिक विचारांचा मार्ग स्वीकारून, लोककेंद्रित आणि शाश्वत शासन उभारण्याचा माझा संकल्प आहे, असं देखील आमदार अमित गोरखे यांनी प्रतिपादन केलं आहे.











