- विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांची आयुक्तांकडे मागणी..
- शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने कठोर नियमावली हवी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२५ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात परराज्यातून येणाऱ्या नागरिक, कामगार, हॉटेल कामगार व व्यावसायिकांसाठी नोंदणीकृत ‘वर्क परमिट’ सक्तीचे करण्याची मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आयुक्तांना सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून औद्योगिक शहर म्हणून विविध राज्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक रोजगार, व्यवसाय व कामानिमित्त येथे स्थायिक होत आहेत. पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार भाडेकरूंची नोंदणी करणे बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात १०० टक्के नोंदणी होत नसल्याची बाब गंभीर आहे. नोंदणी प्रक्रियेत त्रुटी असल्यामुळे शहराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे भोईर यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून तसेच नेपाळ, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, आसाम, पश्चिम बंगाल आदी भागांतून नागरिक मोठ्या संख्येने पिंपरी-चिंचवडमध्ये येत आहेत. औद्योगिक क्षेत्र, हॉटेल व्यवसाय, मजुरी व कौशल्याधारित कामांमध्ये त्यांचा सहभाग आहे. मात्र शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा सर्व परराज्यातील कामगार व नागरिकांना वर्क परमिट सक्तीचे करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रक्रियेमुळे अनधिकृत रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र काढण्याच्या प्रकारांना आळा बसेल तसेच पोलिस प्रशासनाला चरित्र पडताळणी करणे सोपे जाईल, असेही निवेदनात नमूद आहे. अलीकडे सांगवी परिसरात एका घरात बेकायदेशीररीत्या राहणारा नागरिक आढळून आल्याच्या घटनेचा उल्लेख करत भविष्यातील संभाव्य धोके टाळण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
पालिका व पोलिस प्रशासनाने समन्वय साधून परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंदणी व वर्क परमिट प्रणाली राबवावी, तसेच संबंधित व्यवसायिक व मालकांनाही कामगारांची नोंदणी बंधनकारक करावी, अशी विनंती भाऊसाहेब भोईर यांनी केली आहे.












