- मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पत्रकारांसाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) विषयक विशेष व्याख्यान..
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२५ फेब्रुवारी २०२६):- “पत्रकारांनी बदलत्या काळानुसार तंत्रस्नेही होणे ही आजची अत्यावश्यक गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे पत्रकारांच्या नोकऱ्यांसाठी धोका नसून त्यांच्या कामाची गुणवत्ता आणि गती वाढवणारे प्रभावी साधन आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलन, विश्लेषण आणि संशोधन प्रक्रिया एआयमुळे अधिक वेगवान झाली आहे. मात्र, एआयचा वापर करताना संबंधित वाचकवर्ग लक्षात घेऊन योग्य प्रॉम्प्ट तयार करणे आणि प्राप्त माहितीची पडताळणी करणे तितकेच महत्त्वाचे आहे. बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत पत्रकारांनी एआयचा प्रभावी वापर केल्यास त्यांची बातमी अधिक नेमकी, विश्वसनीय आणि वेगळी ठरू शकते,” असे प्रतिपादन सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या विशेष उपस्थितीत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. “पत्रकारिता क्षेत्रात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा उपयोग” या विषयावर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या माध्यम व जनसंज्ञापन विभागाचे उपसंचालक प्रा. सुशोभन पाटणकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
या व्याख्यानादरम्यान विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार, अविनाश चिलेकर, नंदकुमार सातुर्डेकर हे विचारपीठावर उपस्थित होते.
प्रा. पाटणकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता क्षेत्र अधिक सक्षम व प्रगल्भ होणार असल्याचे नमूद केले. बातम्या अधिक माहितीपूर्ण व परिपूर्ण करण्यासाठी एआय उपयुक्त ठरत असून, या तंत्रज्ञानामुळे पत्रकारांच्या नोकऱ्यांवर धोका निर्माण झाला नसून त्यांच्या कामकाजात सुलभता निर्माण होत आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, एआयचा प्रभावी वापर करण्यासाठी त्यासंबंधित तंत्र आत्मसात करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शन सत्रामध्ये एआय म्हणजे काय, ते कसे कार्य करते, एआयचे विविध प्रकार, लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) यांची संकल्पना, तसेच प्रभावी प्रॉम्प्ट लिहिण्याची पद्धत याविषयी त्यांनी उदाहरणांसह सविस्तर माहिती त्यांनी दिली.
एआय प्रणालींमध्ये डेटा सेंटरची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, बातमी तयार करण्यासाठी लागणारा वेळ या तंत्रज्ञानामुळे लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. बातमीसाठी आवश्यक माहिती संकलित करणे, तिचे विश्लेषण करणे आणि संशोधन करणे ही प्रक्रिया एआयच्या साहाय्याने अधिक वेगवान व सुलभ झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय, एआयकडून माहिती घेताना संबंधित बातमी कोणत्या वाचकवर्गासाठी आहे, हे निश्चित करून त्यानुसार प्रॉम्प्ट तयार करणे आवश्यक आहे. तसेच एआयद्वारे प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी करणे गरजेचे असून, त्यासाठी पत्रकारांचा अनुभव व सखोल वाचन उपयुक्त ठरते, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर म्हणाले, “महानगरपालिकेने एआयसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे निश्चितच कौतुकास्पद आहे. आज एआयमुळे बातमी लेखनासाठी आवश्यक संदर्भ, माहिती आणि पार्श्वभूमी सहज उपलब्ध होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा नेमका आणि जबाबदारीने वापर कसा करावा, हे समजून घेण्यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरतात.
पत्रकारिता ही काळानुसार सातत्याने बदलत आलेली आहे. हाताने पाने जुळवण्यापासून ते संगणकाधारित संपादनापर्यंत आपण अनेक तांत्रिक टप्पे अनुभवले आहेत. विज्ञानाच्या प्रगतीसोबत पत्रकारितेतही बदल अपरिहार्य ठरले आहेत. आजच्या डिजिटल युगात एआयचा वापर हा बदलत्या काळाची गरज बनला आहे. अशा पार्श्वभूमीवर एआयविषयी मार्गदर्शन करणारा कार्यक्रम आयोजित करणे ही प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी महत्त्वाची आणि स्वागतार्ह बाब आहे, असे ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पत्रकारांसाठी व्याख्यान आयोजित करण्यामागील भूमिका सांगितली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. प्रसार माध्यमांमध्ये विश्वासार्हता अत्यंत महत्त्वाचे असते. ही विश्वासार्हता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रसारमाध्यम क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आत्मसात करणे गरजेचे आहे, असे देखील ते म्हणाले. तसेच व्याख्यानाला उपस्थित असणाऱ्या सर्व प्रसारमाध्यम प्रतिनिधींचे आभार त्यांनी मानले.












