- आकुर्डीत महापालिका शाळांच्या कला प्रदर्शनाचा शुभारंभ…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी केवळ डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न न पाहता कला, क्रीडा आणि इतर सर्जनशील क्षेत्रातही प्रगती करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करता यावी, यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. याच अनुषंगाने महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित काळा घोडा कला महोत्सव येथे चित्रकला, शिल्पकला व इतर कलाप्रकारांमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. असे प्रतिपादन उपमहापौर शर्मीला बाबर यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी देशातील नामांकित काळा घोडा कला महोत्सव साकारलेल्या चित्रकला, प्रतिकृती व संकल्प शिल्पांचे भव्य प्रदर्शन करण्यासाठी ‘आर्ट बॉक्स’ कार्यक्रमाचे ग. दि. माडगूळकर सभागृह येथे आयोजन करण्यात आले होते.या आर्ट बॉक्स कार्यक्रमाच्या उद्घाटन उपमहापौर शर्मीला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर व कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांच्या अधिपत्याखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर , विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर,नगरसेविका आरती चोंदे, स्नेहा कलाटे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी केले तर आभार प्रदर्शन कला नोडल अधिकारी श्रीकांत चौगुले यांनी केले.
शहराची ओळख केवळ भव्य पूल, रुंद रस्ते किंवा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे निर्माण होत नाही; तर त्या शहरातून घडलेल्या गुणवंत, संवेदनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तींमुळे होते. कला आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी हेच शहराची खरी ओळख बनतात. भविष्यात पिंपरी चिंचवड शहराची ओळख येथील कलाकार, क्रीडापटू आणि सर्जनशील युवा यांच्या नावाने व्हावी, यासाठी आजपासूनच योग्य दिशा देणे गरजेचे आहे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी नमुद केले.
यावेळी मान्यवरांनी प्रदर्शनातील सर्व चित्रे, प्रतिकृती व संकल्प शिल्पे प्रत्यक्ष पाहिली. विद्यार्थ्यांनी स्वतः आपल्या कलाकृतींची संकल्पना, त्यामागील विचार आणि संदेश मान्यवरांना समजावून सांगितला. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि सादरीकरण कौशल्य पाहून उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
या प्रदर्शनात तब्बल १०० महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविण्यात आला असून, विविध विषयांवर आधारित आकर्षक चित्रकला आणि कलामॉडेल्स सादर करण्यात आले.
दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले असून, पिंपरी चिंचवडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले.












