- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रबोधन पर्व नियोजनासाठी शहरातील सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी २०२६):- क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता, सामाजिक समता, शिक्षणाचे महत्त्व आणि संविधानिक मूल्यांची जोपासणे करणे,विचार प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून युवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक सलोखा आणि लोकशाही मूल्यांची रुजवणूक होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी व्याख्याने, परिसंवाद, ग्रंथप्रदर्शने, चित्रफिती, नाट्यप्रयोग तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येते. या पर्वाच्या नियोजनासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुख्यालयातील मधुकर पवळे सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील सामाजिक संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, डॉ. सुहास कांबळे, नगर सदस्या सारिका मासुळकर,माजी नगरसेवक मारूती भापकर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संतोष जोगदंड, बाळासाहेब रोकडे, अंजना गायकवाड, मंदाकिनी गायकवाड, विशाल ओव्हळ, सिद्धार्थ बनसोडे, विजय जाधव, जितेंद्र मोटे, विनोद सरवदे, दगडू गायकवाड, बापूसाहेब गायकवाड, उत्तम कांबळे, लक्ष्मण माने, धीरज वानखेडे, प्रकाश भुक्तर, अभिजित चव्हाण, माणिक शिंदे, गौतम कांबळे, नदीम शेख, बळीराम काकडे, सचिन गायकवाड, ब्रम्हानंद जाधव, अक्ष भालेराव, कैलाश शिंदे, संतोष शिंदे, रघु बनसोडे, महेंद्र सरवदे, राहुल सोनवणे, युवराज तिकोणे, गणेश भोसले, तुकाराम गायकवाड, कविता पालटवाड यांच्यासह अनेक सामाजिक संघटनाचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीत सभागृह नेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगर सदस्य डॉ. सुहास कांबळे यांनी उपस्थित नागरिकांना महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही शहरातील नागरिकांच्या सोबत असल्याचे सांगितले.
विचार प्रबोधन पर्व हे केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विचारांची चळवळ पोहोचवणारे प्रभावी व्यासपीठ कसे बनेल, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी कार्यक्रमांच्या रूपरेषेबाबत सूचना केल्या. स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते, अभ्यासक व वक्ते यांना संधी देणे, तसेच महिलांचा व युवकांचा सहभाग वाढविण्यावर भर देण्याची मागणी करण्यात आली. तसेच विचार प्रबोधन पर्वाच्या आयोजनासाठी संयुक्त नियोजन समिती स्थापन करणे, वेळापत्रक व कार्यक्रमांचे नियोजन वेळेत जाहीर करणे, तसेच प्रसिद्धी-प्रसारासाठी आधुनिक माध्यमांचा वापर करण्याबाबत उपस्थितांनी सूचना मांडल्या.
याशिवाय बैठकीस महापालिकेचे अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी तसेच शहरातील अनेक नामवंत सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. विचार प्रबोधन पर्वाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
माता रमाई स्मारकाचे भूमिपूजन ११ एप्रिल रोजी होणार-महापौर रवि लांडगे
या बैठकीत शहरात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या त्यागमूरती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारकाच्या प्रश्नाकडे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. सामाजिक व ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करत स्मारकाच्या उभारणीस तातडीने सुरुवात करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली.
यासंदर्भात महापौर रवि लांडगे यांनी शहरातील नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन माता रमाई आंबेडकर स्मारकाच्या उभारणीसाठी येत्या ११ एप्रिल रोजी भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे या बैठकीत जाहीर केले.












