- मालमत्ता कर अभय योजना, पाणीपुरवठा, नाले सफाई, भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, भोसरी हॉस्पिटल नामकरण व इंद्रायणी नदी संवर्धनावर झाली सखोल चर्चा….
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी २०२६):- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, पर्यावरण संरक्षण आणि शहरातील मूलभूत सोयीसुविधा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशासनाकडून ठोस व वेळबद्ध कार्यवाही करण्यात यावी. यासाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर बैठक पार पडली. या बैठकीत पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मालमत्ता कर अभय योजना, पाणीपुरवठा, नाले सफाई, भटक्या कुत्र्यांचे व्यवस्थापन, भोसरी हॉस्पिटल नामकरण व इंद्रायणी नदी संवर्धन आदी विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. या संदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त कक्षात झालेल्या बैठकीत महापौर रवि लांडगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर व संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी मालमत्ता करावरील थकबाकी संदर्भात “मालमत्ता कर अभय योजना” प्रभावीपणे राबविण्याबाबत चर्चा झाली. नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा यासाठी जनजागृती व सुलभ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, सदर योजना लवकरच लागू करण्याचे आश्वासन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी बचत उपाययोजना, गळती नियंत्रण, टँकर नियोजन तसेच प्रलंबित व चालू पाणीपुरवठा प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, गटार दुरुस्ती व जलनिस्सारण व्यवस्थेची पूर्वतयारी काटेकोरपणे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय कृती आराखडा तयार करण्याचे ठरले.
शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायदेशीर चौकटीत सर्वसमावेशक उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा झाली. लसीकरण, नसबंदी, जनजागृती आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर यावेळी विशेष भर देण्यात आला.
भोसरी येथील नवीन रुग्णालयास “श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी नवीन भोसरी रुग्णालय” असे नामकरण करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासोबतच इंद्रायणी नदी प्रदूषण नियंत्रण, स्वच्छता मोहीम, औद्योगिक सांडपाणी नियंत्रण, जैविक उपचार प्रकल्प (STP) बळकटीकरण आणि शाश्वत संवर्धनासाठी व्यापक कृती आराखडा तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहराचा विकास, पर्यावरण संरक्षण आणि नागरिकांच्या हितासाठी प्रशासनासोबत समन्वय साधून ठोस व वेळबद्ध कार्यवाही करण्याचा निर्धार यावेळी महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केला.












