- प्रभागातील नगरसेवकांसह आ. शंकर जगताप यांची पाहणी..
- विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड परिसरातील वाहतूक होणार सिग्नलमुक्त व वेगवान…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी २०२६):- चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग क्र. २६ (विशालनगर, पिंपळे निलख, कस्पटे वस्ती, वाकड) येथील रक्षक चौकात उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) व अंडरपासचे काम हाती घेण्यात आले होते. सदर प्रकल्प आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून, आमदार जगताप यांनी नुकतीच कामाची प्रत्यक्ष पाहणी करून अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.
या उड्डाणपूल आणि अंडरपासमुळे परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार असून नागरिकांचा प्रवास सिग्नलमुक्त व वेगवान होणार आहे.
यामुळे औंधकडून रावेतकडे जाणारी वाहतूक अधिक सुरळीत होईल. वाकड फाट्यावरून औंधकडे जाणाऱ्या वाहनांचा वेळ वाचणार आहे. पिंपळे निलख गावातून पुण्याकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होईल.
पाहणीदरम्यान आमदार जगताप यांनी उर्वरित कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. “हा पूल लवकरात लवकर नागरिकांसाठी खुला करावा,” असे निर्देश त्यांनी दिले.
या दौऱ्यात प्रभागाच्या नगरसेविका आरती चोंधे, स्नेहा कलाटे, नगरसेवक विनायक गायकवाड, संदीप कस्पटे, याच्यासह संकेत सुरेश चोंधे (अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहर), सचिन साठे, सह शहर अभियंता प्रेरणा सिनकर, कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता निलेश दाते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरसेविका आरती चोंधे म्हणाल्या, “हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या कायमची सुटण्यास मदत होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”











