- संत तुकाराम नगरमधील आरक्षित जागेचा उडाला बोजवारा..
- आरक्षणाचा बोर्डही गायब; मोकळ्या जागेचा खासगी कारणासाठी अनधिकृतपणे वापर?…
मा. अशोक लोखंडे :- संपादक तथा प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ मार्च २०२६) :- भोसरीतील आळंदी व दिघी रोडच्या दरम्यान असलेल्या संत तुकाराम नगर परिसरात डॉ. आंबेडकर गार्डनसमोरील सर्वे क्र. २१४ मधील आरक्षण क्र. ४०१ अंतर्गत एकरभर जागा सुमारे २० वर्षांपूर्वी महापालिकेने रुग्णालयासाठी आरक्षित केली होती. त्या ठिकाणी यासंदर्भातील फलकही लावण्यात आला होता. याउलट आरक्षणाचा बोर्डही मागील वर्षी रहस्यमयरीत्या गायब झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पालिकेच्या ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरक्षणाची एकूण जागा ४० गुंठे असून त्यापैकी केवळ १७ गुंठेच महापालिकेच्या ताब्यात आहेत. उर्वरित २३ गुंठे जागा ताब्यात आल्यानंतरच रुग्णालय बांधण्याचे नियोजन करण्यात येईल, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
मात्र, मागील २० वर्षांत उर्वरित २३ गुंठे जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने नेमके कोणते प्रयत्न केले, याबाबत प्रशासन मौन बाळगत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. संबंधीत जागेवर आरक्षण टाकूनही प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही न केल्याने हा प्रकार केवळ कागदी आरक्षणापुरताच मर्यादित राहिल्याची टीका होत आहे.
सध्या ही जागा पूर्णपणे मोकळी असून खासगी कार्यक्रम, वाहनतळ (पार्किंग) आणि इतर अनधिकृत वापरासाठी जागेचा सर्रास वापर होत आहे. सार्वजनिक वापरासाठी राखीव असलेली जागा कोणाच्या आदेशावरून खासगी वापरासाठी खुली ठेवली? हा गंभीर प्रकार असून महापालिकेचा यामुळे महसुल देखील बुडत आहे. याला जबाबदार कोण?
स्थानिक नागरिकांच्या मते, भोसरी परिसरात वाढती लोकसंख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयाची नितांत गरज आहे. मात्र दोन दशकांनंतरही रुग्णालय उभारणीबाबत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
रुग्णालयासाठी आरक्षित जागा तात्काळ ताब्यात घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
“मोफत व दर्जेदार सरकारी शिक्षण-आरोग्य हा नागरिकांचा हक्क आहे. संत तुकाराम नगर येथील आरक्षित जागेवर वायसीएमसारखे ८-१० मजली सुसज्ज हॉस्पिटल व पार्किंग उभारावे, त्यासाठी अतिरिक्त FSI मंजूर करून काम तातडीने सुरू करावे. तसेच भोसरी स्मशानभूमी जवळील नव्या हॉस्पिटलची उंची वाढवून आवश्यक डॉक्टर-नर्सेस उपलब्ध करावेत.”
– अॅड. सचिन गोडांबे, सामाजिक कार्यकर्ता, भोसरी…












