- कुत्र्यासोबत त्यांनी केला असा काही प्रकार…
सुरज करांडे, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०२ मार्च २०२६) :- संत तुकारामनगर परिसरात मानवतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही तरुणांनी कुत्र्याला पकडून हवेत गोल फिरवत जमिनीवर आपटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे प्राणीप्रेमींसह परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री सुमारे १.१५ वाजता राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवनाजवळ घडली. फिर्यादी प्रज्वल कमलेश दुबे (वय ३२, व्यवसाय वकील) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वप्नील सखाराम सावंत व इतर चार जणांनी कुत्र्याला मारहाण करून त्याचे मागील दोन पाय पकडून हवेत फिरवले आणि जोरात जमिनीवर आपटले.
इतक्यावरच न थांबता आरोपी व त्यांच्या साथीदारांनी चारचाकी भरधाव चालवत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या कुत्र्यांना उडवण्याचाही प्रयत्न केला.
याप्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पुढील तपास सपोनि पांडे करीत आहेत.












