- संतोष जराड, प्रतिनिधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०४ मार्च २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपल्या तीन उमेदवारांच्या नावांची शिफारस केली आहे. त्यांचे अर्ज गटनेत्यांकडे सादर करण्यात आले आहेत. महापालिकेच्या सर्वसाधरण सभेत या नावांची घोषणा होणार आहे.
पक्षाचे शहरातील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार तसेच युवा नेते पार्थ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक फझल शेख, राजेंद्र जगताप आणि सीमा सावळे यांची नावे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पाठविली आहेत.
या तिन्ही उमेदवारांना स्थानिक राजकारणाचा मोठा अनुभव आहे. फझल शेख यांनी पूर्वी महापालिकेत शिक्षण सभापती म्हणून काम पाहिले असून अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. राजेंद्र जगताप हेही माजी नगरसेवक असून शहराच्या राजकारणात त्यांची मजबूत पकड मानली जाते. सीमा सावळे या माजी नगरसेविका असून आक्रमक भूमिका आणि प्रशासकीय कामांवरील अभ्यासामुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत.
दरम्यान, पक्षाने पुन्हा माजी नगरसेवकांनाच संधी दिल्याने काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना व्यक्त होत आहे. अनेक वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरू झाली आहे.












